सोनं खरेदी करताना हॉलमार्क पाहायला विसरू नका

ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआयएस)कडून सोन्याचे हॉलमार्क ठरवले जातात. कॅरेटनुसार ते बदलतात.

22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 916 लिहिलेलं असतं, तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं.

22 कॅरेटमध्ये 91.66 टक्के सोनं असतं. त्यामुळे 22 कॅरेट सोनं खरेदी केल्यास 24 कॅरेट सोन्याच्या दराची 91.66 टक्के किंमतच प्रति तोळा द्यायला हवी.

हे गणित अनेकजणांना माहित नसतं. त्यामुळे ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 18 किंवा 22 कॅरेटच्या सोन्याची खरेदी करतात.

कधीही सोनं खरेदी करताना त्याचा बाजारातील चालू भाव तपासून घ्या.

तुम्ही जितक्या कॅरेटचं सोनं घेतलंय त्याला 100 ने गुणून 24 ने भाग द्या. जे उत्तर येईल तेवढं टक्के सोनं तुम्ही खरेदी करताय. त्यामुळे तुम्हाला त्याचीच किंमत द्यायची आहे हे लक्षात ठेवा.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 'मेकिंग चार्जेस' अर्थात मजुरी.

हे चार्जेस जास्त असल्यास सोन्याची किंमत वाढते. त्यामुळे दरवेळी सोनं खरेदी करताना आधी मेकिंग चार्जेस विचारून घ्या.

सोन्याच्या दागिन्यांवर लावलेल्या सजावटीच्या साहित्यांचं मूल्य दागिन्यांच्या किंमतीपासून कायम वेगळं असायला हवं.