ताडासन : सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हात जोडा आणि आपल्या छातीजवळ आणा. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेऊन जा. हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या. तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा. 10 सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि श्वास घेत रहा. आता श्वास सोडताना, तुमच्या सुरुवातीच्या मूळ स्थितीमध्ये जा आणि पुन्हा सरळ उभे राहा. हे योगासन 10 वेळा करा.
शीर्षासन : वज्रासनामध्ये म्हणजेच दोन्ही पाय मागच्या बाजूला दुमडून जमिनीवर बसा. तुमचे दोन्ही हात समोर ठेवून बोट एकमेकांमध्ये अडकून जमिनीवर ठेवा. बोटांमध्ये असलेल्या जागेमध्ये डोकं ठेवा. आता पाय उचलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला पाय वर करता येणार नाही. पण तुम्ही थोडे लक्ष केंद्रित केले की, तुमचा पाय तुम्हाला वर नेता येईल. पाय सरळ वर घेऊन याच स्थितीत 30 सेकंद राहा. मानेची हालचाल करु नका, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता असते.
वृक्षासन : जमिनीवर सरळ उभे राहा आणि हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. तुमच्या पायाचा तळवा मांडीला स्पर्श करेल अशा स्थितीत ठेवा. यावेळी तुमचा डावा पाय सरळ ठेवा आणि शरीराचा समतोल राखा. या आसनात दीर्घ श्वास घेत राहा. आता तुमचे हात जोडा आणि ते डोक्याच्या बाजूला सरळ वर न्या. तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले असावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. या आसनात 30 सेकंद राहा. श्वास सोडा आणि परत सामान्य स्थितीत या. हेच दुसऱ्या पायाने करा.
धनुरासन : हे आसन पोटावर झोपून करण्याच्या प्रकारातलं एक आसन आहे. हे आसन करण्यासाठी पोटावर पालथं झोपावं. आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडावेत. त्यानंतर दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही पाय धरावेत. तुमचे पाय आणि हात शक्य तितके उंच उचला. वर पाहा आणि काही वेळ याच अवस्थेत राहा. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागाला बाण नसलेल्या धनुष्यासारखा आकार मिळतो.
पश्चिमोत्तानासन : दोन्ही पाय समोर ठेवून बसावं. गुडघे थोडे वाकवून ठेवू शकता. पाठीचा कणा सरळ ठेवावा. श्वास सोडताना, कमरेपासून पुढे वाकावं. हाताच्या बोटांनी पायाची बोटं धरावीत.