महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्यपद्धती प्रसिद्ध आहेत.
विदर्भतील ‘गोळा भात’ हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात फेमस आहे.
हा गोळा भात कसा तयार होतो? याची रेसिपी वर्धा येथील साधना पवार यांनी सांगितली आहे.
साहित्य : 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 ग्लास तांदूळ, 2 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आवश्यक आहे.
याचबरोबर मेथीची तोडलेली भाजी, वाटीभर वाटाणे, तिखट, मीठ, हळद, मसाला, जिरेपूड, धणेपूड, तेल, हे साहित्य लागेल.
रेसिपी : सर्वप्रथम चना डाळ आणि तूर डाळ 2 तास भिजत घालून भिजल्यानंतर मिक्सर मधून जाडसार काढून घ्यायचं आहे.
बारीक करताना त्यात थोडे वाटाणे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मेथीची भाजी टाकायची आहे.त्यानंतर त्यात तिखट मीठ, हळद हे मसाले घालून हे सारण गोळे बनविण्यासाठी तयार आहे.
त्याचे हाताने गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता एका कढईत किंवा गंजात पाणी उकळल्यावर वर चाळणी ठेवून गोळे वाफवून घ्या.
तोपर्यंत एका कुकर मध्ये तेल घेऊन जिरे घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन भात फोडणी द्यायचा आहे. भात शिजेपर्यंत 10- 15 मिनिट झाल्यानंतर गोळेही वाफवून तयार होतील.
आता हे गोळे भातावर ठेऊन परत 5 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. जेणेकरून मस्तपैकी सुवास सुटेल.