हरभऱ्याच्या कोवळ्या पानांमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. विदर्भात हरभऱ्याच्या या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठीही केला जातो.
कमी साहित्यात आणि अगदी सोप्प्या पद्धतीने कमी वेळात बनवून तयार होणारी ही भाजी आहे. या भाजीची रेसिपी वर्ध्यातील गृहिणी हिना राऊत यांनी सांगितली आहे.
साहित्य : कोवळी तोडून घेतलेली हरभऱ्याची पाने, वाफवलेले तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, हळद, तिखट, मीठ, जिरे, बारीक चिरलेला लसूण आवश्यक आहे.
यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे साहित्य लागणार आहे.
सर्वप्रथम कढईमध्ये थोडसं तेल घेऊन त्यात जिरे आणि लसूण अॅड करायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे.
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे असलेले मसाले म्हणजेच हळद, तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट अॅड करायचा आहे.
चांगलं परतून झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो आणि वाफवलेले तुरीचे दाणे ॲड करून पुन्हा चांगलं परतून घ्यायचा आहे.
आता हरभऱ्याची कोवळी तोडलेली पाने अॅड करून मस्तपैकी परतून घेऊन वाफ येण्यासाठी झाकून ठेवायची आहे.
एक वाफ काढून घेतल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे.