...आणि धोनी 20 वर्षांनी मूळगावी परतला!

धोनी खेळाडू म्हणून लय भारी आहेच, मात्र त्याचं साधं राहणीमान लोकांना प्रचंड आवडतं.

उत्तराखंडच्या अल्मोडा भागातील ल्वाली हे आहे धोनीचं मूळगाव.

त्याचे वडील पान सिंह धोनी यांनी जवळपास 45 वर्षांपूर्वी झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये केलं होतं स्थलांतर. त्यामुळे धोनी लहानाचा मोठा तिथेच झाला.

परंतु म्हणतात ना की, माणूस कुठेही राहिला तरी त्याची नाळ आपल्या मूळ मातीशी जोडलेली असते.

ल्वालीमध्ये आजही राहतात धोनीचे नातेवाईक. त्यांना भेटायला तो 2003 साली याठिकाणी आला होता. तेव्हापासून गावकरी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.

तब्बल 20 वर्षांनंतर धोनी आपली पत्नी साक्षी आणि काही मित्रांसह बुधवारी मूळगावात दाखल झाला.

त्याला पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणाच्याच आनंदाला पारावर उरला नव्हता.

त्यांनी पारंपरिक पद्धतीने केलं त्याचं स्वागत. धोनीनेही सर्वांची आपुलकीने केली विचारपूस. तिथल्या लोकांशी अगदी त्यांच्यातला एक होऊन तो बोलत होता.

बुधवारी सकाळी साधारण 10:30 वाजताच्या सुमारास धोनी गावात पोहोचला. त्यानंतर सगळ्यांना भेटून, सगळ्यांसोबत फोटो काढून कुलदेवतेचं दर्शन घेऊन दुपारी 1:30 वाजता तिथून निघाला. 

निघताना गावकऱ्यांनी त्याच्याकडे पुन्हा नक्की ये, अशी हक्काची मागणी केली. धोनीमुळे गावात एखाद्या सोहळ्यासारखं वातावरण निर्माण झालं होतं.