सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश मधील बागा आठवतात. तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर मानलं जाणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणीची लालबुंद स्ट्रॉबेरीसाठी ओळख आहे.
पण याच पाचगणीतील स्ट्रॉबेरीच्या मळ्यात आता सफरचंद पिकतंय. सातारा जिल्ह्यातील खिगर येथील उच्चशिक्षित शेतकरी अनिल दुधाने यांनी ही किमया केलीय.
हिमाचल प्रदेशातून रोपे आणून त्यांनी पाचगणीत सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उंच डोंगररांगामुळे या भागात पाऊस आणि हिवाळ्यात चांगलाच गारवा असतो.
अनिल दुधाने यांना 11 एकर शेती आहे. या शेतीमध्ये स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केली जाते.
त्याचबरोबर गुजबेरी, राजबेरी, ड्रॅगन फ्रुट, पॅशन फ्रुट, भाजीपाला आणि रब्बी पिकेही ते घेत असतात.
पाचगणी परिसरात 4 महिन्यापेक्षा जास्त काळ थंडीचा असतो. त्यामुळे दुधाने यांनी सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
पारंपरिक स्ट्रॉबेरीच्या शेतीसोबतच शेतकऱ्यांनी सफरचंद लावायचं ठरवलं. अनिल दुधाने यांनी हिमाचल प्रदेशातून सफरचंदाच्या 4 प्रकाराची रोपे आणली.
सोनेरी, रेड डिलिशियस, लाल आंबेरी मार्कोटेस्ट, हार्मोन 99 या जातीची 20 रोपाची लागवड त्यांनी केली. यातील हार्मोन 99 या जातीच्या झाडांना सफरचंद आले असल्याचे त्यांनी सांगितले.