महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके दुष्काग्रस्त म्हणूनच ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव हे यापैकीच आहेत.
याच दुष्काळी भागातील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात.
कातर खटावचे प्रगतशील शेतकरी रवींद्र पाटील यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट लावले आहेत. विशेष म्हणजे अत्यंत कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रुट एकदा लावले की 25 वर्षांपर्यंत उत्पन्न देत राहते.
खटाव तालुक्यातील शेतकरी नेहमीच रब्बी आणि खरिपाची बाजरी, ज्वारी, गहू, मका अशी पिके घेत असतात. कातर खटाव येथील रवींद्र पाटील यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट लावण्याचा निर्णय घेतला.
ड्रॅगन फ्रुटला पाणी कमी लागते. तसेच 80 टक्के सेंद्रीय आणि 20 टक्केच रासायनिक खतांचा वापर केला जातो.
त्यासाठी दीड एकर क्षेत्रात 1 हजार पोल उभे केले आणि त्यावर 4 हजार रोपांची लागवड केली. यासाठी एकरी 6 लाख रुपयांपर्यंत खर्च आला, असे पाटील यांनी सांगितले.
येत्या मे महिन्यापासून ड्रॅगन फ्रुटला फळे येण्यास सुरुवात होईल. वर्षातून 5 वेळा फळ काढले जाते.
एकरी 8 ते 10 टन माल निघतो. बाजारभावाचा विचार केला तर 80 ते 250 रुपयांपर्यंत दर ड्रॅगन फ्रुटला मिळतो.
सरासरी 125 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने चांगला नफा राहतो. दीड एकरातून 8 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा विश्वास शेतकरी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.