श्रावणात हिरव्या बांगड्यांचं काय आहे महत्त्व? 

श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे.

या बांगड्याचं अध्यात्मिक महत्त्व डोंबिवलीतील गुरुजी प्रदीप जोशी यांनी सांगितले आहे.

हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्रावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक हिरवागार झालेला असतो.

सृष्टीला आणि दृष्टीला हा हिरवा रंग आनंद देतो. उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरु होतो.

हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो. या उत्सवात पार्वतीला निसर्गातील फुल, फळ आणि पानांपासून सजवलं जातं.

तिला झोपाळ्यावर बसवून  झोका दिला जातो त्यालाच दोलोत्सव असे म्हणतात.

ही प्रथा उत्तर भारतात आहे. त्यावेळी सौभाग्याचे लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात.

हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे. म्हणून बुधाचा खडा पाचू देखील हिरव्या रंगाचा असतो.

काच ही वाळूपासून बनवली जाते. वाळू हे हे एक सृष्टीतील प्रतिक आहे त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्त्व अधिक आहे.

बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरण चांगले राहते.

स्त्रियांच्या कोमल हाताला भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते, अशी माहिती जोशी यांनी दिली.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)