कोल्हापूर हा एक सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. मात्र तरी देखील वाढत्या शहरीकरणामुळे कोल्हापुरातील काही भागात वृक्षसंख्या बरीच घटलेली पाहायला मिळते.
माळरानावर पशुपक्ष्यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात या मुक्या जीवांचे पाण्याविना हाल होत असतात.
त्यामुळेच काही संस्था यासाठी पुढे येत असतात. अशीच एक सामाजिक संस्था कोल्हापुरात पुढे येऊन काम करत आहे.
येणाऱ्या उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आत्ताच कृत्रिम पाणवठे या संस्थेकडून तयार करण्यात आले आहेत.
खरंतर पर्यावरणाची व्याख्या ही खूप मोठी आहे. वृक्षसंपदेसोबतच इतर पशूपक्षी, कीटक आदी सर्वांचा यामध्ये समावेश होतो.
वृक्षप्रेमी वेल्फेअर फाउंडेशन कोल्हापूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य करते.
याच संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरातील माळरानावर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून ‘पक्षीतीर्थ’ उपक्रमातून बनवण्यात आलेल्या या कृत्रिम पाणवठ्यांमुळे येत्या उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची काही प्रमाणात पाण्याची सोय पूर्ण होईल.
उन्हाळ्यात कडक ऊन असणाऱ्या टेंबलाईवाडी टेकडी, राजाराम कॉलेज टेकडी, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, आदी ठिकाणी हे कृत्रिम पाणवठे पशुपक्ष्यांची तहान भागवतील.