नवीन वर्ष सुरु झालं की पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा येतो.
तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून ‘तिळगूळ घ्या गोड- गोड बोला’ असे सांगत वर्षाची सुरुवात आपण गोड करत असतो.
तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे ‘हलव्याचे दागिने’. या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे.
दागिने घालण्याची ही पद्धत पारंपरिक आहे. पुण्यातील बाजारपेठेत या दागिन्यांच्या भरपूर व्हरायटी दिसत आहेत.
पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी हलव्याचे दागिने अगदी 70 रुपयांपासून पुढील किमतीस मिळत आहेत.
हे दागिने आता ट्रेंडी झाले आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या दागिन्यांमध्ये अधिक कला-कुसर पाहायला मिळत आहे.
हलव्याच्या दागिन्यामध्ये तुम्हाला पारंपरिक दागिने जास्त पाहायला मिळतील.
यात ठुशी, शाही हार, मोहन माळ, बोर हार, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, बिंदी, कंबरपट्टा, मुकूट, वाकी, नथ असे एकाहून एक दागिने सध्या बाजारात उपलब्ध आहे.